चंदगडकरांनो घराणेशाहीचीच गुलामगिरी कधीपर्यंत करायची? मानसिंग खोराटे यांचा सवाल; परिवर्तनाच्या लढाईत सामील होण्याचे आवाहन

Total Views : 135
Zoom In Zoom Out Read Later Print

चंदगडकरांनो घराणेशाहीचीच गुलामगिरी कधीपर्यंत करायची?मानसिंग खोराटे यांचा सवाल

चंदगडकरांनो घराणेशाहीचीच गुलामगिरी कधीपर्यंत करायची?
मानसिंग खोराटे यांचा सवाल; परिवर्तनाच्या लढाईत सामील होण्याचे आवाहन

चंदगड (प्रतिनिधी) : आमदाराचा पोरगा आमदार, खासदाराचा पोरगा खासदार होतो. नाहीच झालं काही तर ते त्यांना गोकुळ, केडीसीसी, खरेदी विक्री संघात बसवतात. त्यातूनही नाहीच जमलं तर शिक्षण संस्था देऊन बक्कळ पैसा कमावतात, त्यातूनही काँट्रॅक्टर लॉबी आहेच यांना सांभाळायला. आपला गरीब कामगार, शेतकऱ्याचा पोरगा फिरतोय वर्षानुवर्षे यांचा कार्यकर्ता बनून. पण, यांना कुठे राजकीय संधी आली की, लगेच आपल्या वारसाला पुढे करतात. त्यामुळे चंदगडकरांनो किती दिवस या घराणेशाहीची गुलामगिरी करणार? गुलामगिरीची जोखड फेकून द्या, हिम्मत करा, बदल हवा तर आमदार नवा या आपल्या संकल्पनेला खरी ठरवा... मला साथ द्या, पाठबळ द्या. चंदगड मतदारसंघात आता शाश्वत विकासासाठी परिवर्तनाची लाट आली आहे, त्यात सहभागी व्हा असं आवाहन मानसिंग खोराटे यांनी केलं. गडहिंग्लज, आजरा, चंदगड भागातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते . सध्या घरोघरी जाऊन सुरू असलेल्या प्रचाराचा आणि लोकांच्या प्रतिसादाचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी चंदगड तालुक्यात आजपर्यंत होत आलेल्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. यावेळी ॲड. संतोष मळविकर, जगन्नाथ हुलजी,बी.एम पाटील, बाळाराम फडके, बाळासाहेब हळदणकर, बसवराज आरबोळे, अरुण गवळी, राजवर्धन शिंदे सांबरेकर, बाबुराव पाटील, आनंदा जाधव, भरमु जाधव, विश्वनाथ ओऊळकर, उदय पाटील, सुनील शिंदे यांच्यासह सहकारी उपस्थित होते.


खोराटे म्हणाले, आजपर्यंत चंदगड तालुक्याचं राजकारण हे त्याचं त्या घरण्यांभोवतीच फिरत राहिलं आहे. त्यांनी फक्त आपल्याच डेअरी, सोसायटी, पतसंस्था, बँक, शाळा, संस्था यावर राजकारण केलं. 'आम्ही सगळे भाऊ भाऊ सगळच वाटून खाऊ' अशी यांची गत आहे. त्यांनी कधीच कुठल्या कार्यकर्त्याला मोठं केलेलं नाही. कुठे संधी दिसली की आपली बायको, आपला मुलगा, आपला भाचा... असं फक्त आपलंच घर भरलं. कार्यकर्त्यांनी त्यांच्या फक्त सतरंज्या उचलायच्या अशी अवस्था करून ठेवली आहे. त्यामुळे आता राजकारणाची ही दिशा बदलायची वेळ आली आहे. ज्याच्याकडे नेतृत्व गुण आहे, ज्याच्यात धमक आहे त्याला पुढे करायची हीच योग्य वेळ आहे. चांगल्या तरुणांनी राजकारणात येण्याची संधी आहे, त्याला जर योग्य व्यासपीठ मिळायचं असेल तर परिवर्तन करा. एकदा संधी द्या चंदगडच्या राजकारणाची दशा आणि दिशा नक्की बदलून दाखवेन अशी ग्वाही खोराटे यांनी दिली. 



याच राजकारणानं दौलतचा बळी घेतला...


चंदगडची जीवन वाहिनी, खरी दौलत असलेला दौलत सहकारी साखर कारखाना याच घराणेशाहीच्या राजकारणाचा बळी गेला. त्याला कोणी वाली राहिलं नव्हतं. अशात अनेकांनी प्रयत्न करून बघितले पण, यांनी त्यांना टिकू दिलं नाही. जेव्हा मी देखील हा कारखाना चालवण्यासाठी पुढे आलो, त्यावेळी मलाही तीच भीती घालण्यात आली, की इथल्या राजकारणामुळे तुम्हाला कारखाना चालू देणार नाहीत. पण, मला माहित होतं, शेतकरी, कामगार ज्यांना कारखाना बंद असल्याने यातना भोगाव्या लागत आहेत, ते हा कारखाना सुरळीत चालू देतील आणि त्यांना न्याय दिला तर दौलतचं शिवधनुष्य मी नक्की पेलू शकेन. आणि झालंही तसचं, शेतकरी, कामगार आणि चंदगडची सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी उभी राहिली आणि दौलत कारखाना अवघ्या तीन वर्षात टॉप फाईव्ह कारखान्यात आला. या सगळ्याचं श्रेय इथल्या चंदगडकरांना आहे. त्यामुळे याच जनतेच्या भरवशावर मी या पाटलांना घाबरत नाही, आणि हीच जनता त्यांना यावेळी विधानसभेत त्यांची जागा दाखवून देईल. या विधानसभेत जनसुराज्य शक्ती पक्षाच्या 'नारळाची बाग' या चिन्हावर भरघोसच असं मताचं दान देऊन हे चंदगडकर मला विधानसभेत पाठवतील असा ठाम विश्वास मानसिंग खराटे यांनी व्यक्त केला.

See More

Latest Photos