कोवाडचे महाविद्यालय सामान्यांचा आधार : माजी राज्यमंत्री भरमु अण्णा पाटील
कोवाडचे महाविद्यालय सामान्यांचा आधार : माजी राज्यमंत्री भरमु अण्णा पाटील
कोवाड/ प्रतिनिधी ...ता. ३० ः कोवाड भागातील उच्च शिक्षणाची गरज ओळखून विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तिनी सर्वोदय शिक्षण संस्थेची मुर्हतमेढ रोवली. २९ वर्षापूर्वी कला शाखेच्या माध्यमातून सुरु झालेल्या महाविद्यालयात वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक कोर्सेस सुरु करुन ग्रामीण भागातील गोरगरीब कुटूंबातील मुलांच्या शिक्षणाची सोय केली. सामाजिक दृष्टीकोन ठेवून कार्यरत असलेले सर्वोदय शिक्षण संस्थेचे कला महाविद्यालय सामान्यांचा आधार ठरल्याचे मत माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांनी व्यक्त केले.
येथील सर्वोदय शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा २९वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे होते.
वर्धापन दिनानिमत्त महाविद्यालयात आयोजित केलेल्या पाककला, भितीपत्रक व रांगोळी प्रदर्शनाचे उदघाटन भरमूआण्णा पाटील यांच्या हस्ते झाले. डॉ. पी. एस. पाटील यांनी ग्रंथालयाला १०० पुस्तके भेट दिली. कला महाविद्यालय सुरु केल्याने मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढल्याचे सांगताना भरमूआण्णा पाटील म्हणाले, माझ्या मंत्रीपदाच्या काळात तालुक्यातील तीन महाविद्यालयाना मंजूरी मिळवून दिली. सामान्य जनतेने मला आमदारकीची संधी दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्रीपदाची माळ घातली. त्यामुळे मिळालेल्या संधीचा उपयोग करताना शिक्षण, शेती, पाणी, तलावांच्या प्रश्नाना प्राधान्य दिले.
सामान्यांचे प्रश्न घेऊन नेहमी कार्यरत राहिल्याने शिक्षणासारख्या सामाजिक संस्था उभारल्याचे समाधान वाटते असे सांगून शिक्षण संस्था मोठ्या झाल्या तर उच्च दर्जाचे शिक्षण मुलाना मिळेल, असा विश्वास त्यानी यावेळी व्यक्त केला. सचिव एम. व्ही. पाटील यांनी शिक्षण संस्थेच्या वाटचालीचा इतिहास सांगितला. प्राचार्य एम. एस. पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्ष डॉ. जांभळे यांनी नवनवीन कोर्सेस सुरु करुन महाविद्यालयाची व्याप्ती वाढत असल्याचे सांगितले. यावेळी एस. एम. फर्नांडिस, डॉ. पी. एस. पाटील, लक्ष्मण कडोलकर, शिवराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बी. के. पाटील, याकूब मुल्ला, जोतिबा वांद्रे, व्ही. आर. पाटील, ए. के. कांबळे, नरसिंग बाचूळकर, नरसिंह पाटील यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. महोन घोळसे यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. ए. के. कांबळे यांनी आभार मानले.
---------