कोवाड येथील उपोषण स्थगित , पाण्याच्या टाकीची होणार पुन्हा चौकशी

Total Views : 245
Zoom In Zoom Out Read Later Print

कोवाड येथील उपोषण स्थगित , पाण्याच्या टाकीची होणार पुन्हा चौकशी

कोवाड, ता. ४ ः येथील जलजीवन मिशन योजनेंतर्गत झालेल्या कामाची चौकशी व्हावी व चुकीच्या पध्दतीने बांधकाम झालेली पाण्याची टाकी पाडण्याच्या शासकीय आदेशाची अंमलबजावणी  व्हावी,या मागणीसाठी कोवाड ग्रामस्थांनी मंगळवार पासून सुरु केलेले साखळी उपोषण आज आमदार राजेश पाटील यांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले. गडहिंग्लज विभागाचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता परेशचंद्र आलटकर यांनी  पाण्याच्या टाकीचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेऊन प्राप्त होणाऱ्या अहवालानुसार कार्यवाही करण्यात येईल, अशा आशयाचे जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याचे पत्र  दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी साखळी उपोषण स्थगित केले.

कोवाड येथील जलजीवन मिशन योजनेंतर्गत झालेल्या कामाची चौकशी व्हावी व पाण्याच्या टाकीबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी,यामागणीसाठी गेल्या अनेक महिन्यापासून चळवळ उभी केली होती. शासकीय अधिकारी त्याची दखल घेत नसल्याने ग्रामस्थांनी मंगळवापासून ग्रामपंचायतीच्या शेजारी साखळी उपोषण सुरु केले होते. दरम्यान बुधवारी आमदार राजेश पाटील यांनी याची गंभिर दखल घेऊन पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याना कार्यवाही करण्याबाबत कडक शब्दात सुचना केल्या. आमदार पाटील यांनी दुपारी उपोषणस्थळी भेट देऊन ग्रामस्थांची चर्चा केली. त्यावेळी उपअभियंता आलटकर हे कार्यकारी अभियंत्याचे पत्र घेऊन उपोषणस्थळी हजर झाले व  पाण्याच्या टाकीचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल ऑडीट  प्राप्त झालेनंतर येणाऱ्या अहवालानुसार कार्यवाही करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. यावेळी ग्रामस्थांनी गेल्या आठ महिन्यापासून शासकीय अधिकाऱ्यानी  या कामात  दिरंगाई केल्याच्या कारणावरुन आलटकर याना धारेवर धरले. चुकीच्या पध्दतीने टाकीचे काम झाल्याचे आपल्याच विभागाकडून ठेकेदाराला लेखी कळविले असताना त्यावर अद्याप कारवाई का केली नाही. असा प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. ग्रामस्थांच्या मागणीनुसार पाण्याच्या टाकीचे काम शासकीय नियमानुसार व्हावे. योजनेचे काम गुणवत्तापूर्वक होण्याच्यादृष्टीने अधिकाऱ्यानी लक्ष घालावे,अशा सुचना आमदार पाटील यांनी अधिकाऱ्याना केल्या. कार्याकारी अभियंत्यांच्या लेखी पत्रानंतर ग्रामस्थानी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अशोकराव देसाई, जानबा कांबळे, कल्लापा वांद्रे, शंकर पाटील, अजित व्हन्याळकर, संभाजी आडाव, राहूल देसाई, चंद्रकांत कुंभार, गोपाळ जाधव, विजय सोनार, तानाजी आडाव, देवजी पाटील, पुंडलिक वांद्रे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

-------------

गडहिंग्लज विभागातील अनेक गावातून जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांच्या तक्रारी येत असल्याने त्यांची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांचेकडे केली आहे.  

राजेश पाटील (आमदार)

-------------------

कोवाड ः जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याचे लेखी पत्र ग्रामस्थाना देताना आमदार राजेश पाटील, उपअभियंता परेशचंद्र आलटकर .

See More

Latest Photos