कोवाड परिसरात एस .टी . कधी सुरळीत होणार ?

Total Views : 246
Zoom In Zoom Out Read Later Print

कोवाड परिसरात एस .टी . कधी सुरळीत होणार ?

कोवाड, ता. ५ ः कोवाड भागातील एस.टी. बस सेवा सुरळीत  नसल्यान शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बस अचानक रद्द करणे, वेळेत बस न येणे अशा अनेक कारणामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे आगार प्रमुखानी प्रत्यक्षात भागाची पाहणी करुन अडचणी समजून घ्याव्यात व बस सेवा सुरळीत करुन विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी,अशी मागणी कोवाड येथील श्रीमान व्ही. पी. देसाई कॉलेजचे शिक्षकांच्या शिष्टमंडळाने आगार प्रमुखांच्याकडे केली आहे. उपप्राचार्य प्रा. एस. एम. माने यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आगार प्रमुख सतीष पाटील यांना निवेदन दिले. निवेदन स्विकारुन तात्काळ बस सेवा सुरळीत करण्याचे आगार प्रमुख पाटील यांनी आश्वासन दिले.
कोवाड येथे श्रीमान व्ही. पी. देसाई व कला महाविद्यालयात दोन हजार विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. यातील बहुतांशी विद्यार्थी परगावाहून एस. टी. बसने येतात. विद्यार्थ्यानी पासही काढले आहेत. पण बस सेवा सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कॉलेज रुट असलेल्या बस अचानक रद्द केल्या जातात. त्याची कल्पनाही दिली जात नाही. विद्यार्थी बसची वाट पाहत तासनतास रस्त्यावर थांबतात. तसेच वेळेत बस नाहीत. कधी लवकर तर कधी वेळाने बस येतात. बेभरोशाच्या या बस सेवेबाबत पालक व विद्यार्थी वैतागले आहेत. बसबाबत विद्यार्थ्यांच्या शालेय प्रशासनाकडे तक्रारी येत आहेत.  १० ते १५ किलोमिटर अंतरावरुन विद्यार्थी कॉलेजला येतात. एखाद्या दिवशी बस रद्द झाली तर लांब अंतरावरील विद्यार्थ्यांचे हाल होतात. यामध्ये मुलींची संख्या मोठी असल्याने पालकांतून रोष व्यक्त केला जात असल्याचे म्हणणे उपप्राचार्य माने यांनी निवेदनातून मांडले आहे. बस सुरळीत करुन विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी,अशी मागणी केली आहे. यावेळी प्रा. ए. टी. पाटील, प्रा. विनोद पाटील, प्रा. एस. एच. पाटील. प्रा. के. एन. तेऊरवाडकर, प्रा. एस. एस. खवणेवाडकर, प्रा. महेश पाटील उपस्थित होते.  
--------------------------------

See More

Latest Photos